प्रत्येक कुटुंबामध्ये आता इंटरनेट आवश्यकच बनले आहे. इंटरनेटमुळे सर्व प्रकारच्या माध्यमांचा वापर करणे कुटुंबियांना शक्य होते. घरातील कॉँप्यूटर तसेच मोबाइल फोन्स इ. चा वापर बरेचदा कुटुंबियांकडून – लहान तसेच तरूण मुलामुलींसहित - सामाईकपणे केला जातो. कॉँप्यूटर आणि इंटरनेटच्या एकत्रित वापराने तुम्ही तसेच तुमचे कुटुंबीय ताज्या बातम्या वाचू-पाहू शकता, माहिती मिळवू शकता, ऑनलाइन खरेदी करू शकता, ऑनलाइन तिकिटे काढू शकता, मित्रपरिवाराला इमेल पाठवू शकता, गाणी ऐकू शकता तसेच गेम्सही खेळू शकता. इंटरनेटवर शिकण्याच्या आणि माहिती मिळवण्याच्या संधी अक्षरशः अमर्याद आहेत. परंतु नेटवरील सर्वच माहिती आणि संधी सुरक्षित आणि भरवशाच्या असतील असे नाही.
तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचा नेटवरील अनुभव सुरक्षित, आनंददायक आणि ज्ञानवर्धक असेल ह्याची खात्री कशी करावी? तुमची आणि कुटुंबियांची आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग आणि सॉफ्टवेअर किंवा फाइल्स उतरवून घेणे ह्यांसारख्या बाबींची चर्चा सर्व कुटुंबियांशी करणे किंवा त्यावर प्रौढ व्यक्तींची देखरेख असणेही गरजेचे आहे.
इंटरनेटची रचनाच लोकांशी आणि माध्यमांशी जोडले जाण्यासाठी केलेली असल्यामुळे अपरिचित व्यक्ती तुमच्या कॉँप्यूटर सिस्टिममध्ये घुसण्याचा थोडासा धोका असतोच. इतरही प्रकारचे धोके इथे असू शकतात, उदा. काही कंपन्या नेटवरील तुमच्या व्यवहारांवर नजर ठेवतात. इंटरनेटवर तुम्ही सुरक्षितच राहण्याची हमी कोणीच देऊ शकत नाही परंतु इंटरनेटच्या वापरादरम्यान स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. माहिती आणि सल्ला मिळवण्यासाठी नेंट खूपच उपयुक्त आहे परंतु त्यावर दिसणारी प्रत्येक बाब खरी किंवा विश्वासपात्र असतेच असे नाही. कोणीही कोणतीही माहिती नेटवर पोस्ट करू शकतो आणि ती सर्वच भरवशाची असेलच असे नाही. काही व्यक्ती आणि संस्था नेटवर माहिती ठेवण्यापूर्वी, आवश्यक ती काळजी घेऊन, तिच्या खरेपणाची खात्री करतात तर काही लोक मुद्दामच खोटी माहिती देण्याचीही शक्यता असते.
वेब सर्फिंग करताना तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी खालील बाबी ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे:
- ऑनलाइन माहितीचा खाजगीपणा जपता येत नाही.
- ऑनलाइन भेटणारे लोक प्रत्यक्षात तसेच असतील असे नाही.
- कोणीही कोणतीही माहिती ऑनलाइन ठेवू शकतो.
- ऑनलाइन असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा नसतो.
- तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वेबवर अनपेक्षितपणे जातीय, हिंसाचारयुक्त, अश्लील, लैंगिक (बाल-लैंगिकतेसहित), अवमानकारक मजकूर अथवा चित्रे इ. दिसू शकतात.
ISEA ह्या जागृतिविषयक कार्यक्रमाद्वारे, कुटुंबियांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल नेहमीच माहिती व सूचना दिल्या जातील. चॅट करण्यापूर्वी, सोशल नेटवर्क वापरण्यापूर्वी, ऑनलाइन शॉपिंग तसेच फाइल्स, गेम किंवा इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यापूर्वी त्या पायर्यांचा / सूचनांचा अवलंब करा.
पायरी 1 : घरातील वायफाय (Wi-Fi) नेटवर्क सुरक्षित करा.
आपल्या घरामधील वायफाय जोडणीमुळे घरातून कोटूनही इंटरनेटवर जाता येते. परंतु ह्याच बाबीमुले इंटरनेटवरील व्यवहारांवर आणि माहितीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे तुम्हाला अवघड होते. हे वायफाय नेटवर्क सुरक्षित नसेल तर घुसखोर तुमची बॅँडविड्थ वापरू सकतात किंवा आपल्या साधनांमध्ये मालवेअर घुसवून घरातील इंटरनेटच्या सुरक्षिततेला बाधा आणू शकतात. असे लोक तुमची सिस्टिम, इतरांच्या सिस्टिमवर हल्ला चढवण्यासाठी, वापरू शकतात.
- शासकाने (ऍडमिनने) दिलेला मूळचा (डीफॉल्ट) पासवर्ड बदलून वेगला सुरक्षित पासवर्ड वापरा.
- वायफायचे मोडेम सुरक्षित असल्याची खात्री करा
- राउटर वापरण्यासाठी मजबूत पासवर्डचा उपयोग करा.
- इतरांनी आपले नेटवर्क "पाहणे" टाळण्यासाठी तसेच त्यावरील प्रवेश मर्यादित ठेवण्यासाठी वायरलेस एन्क्रिप्शन सक्रिय करा.
- आपल्याकडील वायरलेस नेटवर्कवर विशिष्ट साधनांनाच प्रवेशाची अनुमती द्या. नेटवर्कशी संवाद साधू सकणार्या प्रत्येक साधनाला एक अद्वितीय मीडिया ऍक्सेस कंट्रोल (MAC) पत्ता दिलेला असतो, त्याचा वापर करा.
- अयोग्य आशय दाखवणार्या वेबसाइट्स टाळण्यासाठी फिल्टरिंग (गाळणी) पर्यायांचा उपयोग करा.
पायरी 2 : मुलांनी आणि कुटुंबियांनी वापरण्याचा कॉँप्यूटर सामाईक खोलीत ठेवा
कुटुंबातील सर्वजण वापरीत असलेल्या सामाईक खोलीत कॉँप्यूटर ठेवणे ही बाब कुटुंबातील मुले आणि वयस्कर व्यक्तींसाठी महत्त्वाची आहे. तुम्ही त्यांना मदतही करू शकता आणि लक्षही ठेवू शकता ज्यायोगे त्यांच्यासाठी इंटरनेट नेहमीच सुरक्षित राहील. तसेच ह्यामुळे घरातील लहान मुले किती वेळ कॉँप्यूटर वापरतात ह्यावरही नियंत्रण राहते आणि वयस्कर व्यक्तींना इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानच्या सहाय्याने नवनवीन गोष्टी शिकता येतात.
पायरी 3 : इंटरनेट वापरण्याबद्दलचे कुटुंबातील नियम ठरवा
इंटरनेटच्या कौटुंबिक वापराबद्दल तुम्ही काय करावे आणि काय टाळावे हे निश्चित करून द्या. कॉँप्यूटर, टॅब आणि स्मार्टफोन्सच्या वापरासंबंधीचे स्पष्ट नियम आणि निकष ठरवणे आवश्यक आहे. ह्यासाठी खालील बाबींचा विचार करा:
- इंटरनेट वापरण्यापूर्वी कुटुंबियांनी, विशेषतः लहानांनी, तुमची परवानगी मागणे.
- कॉँप्यूटर आणि इतर साधने कोणत्या दिवशी कोणत्या वेळी आणि किती वेळपर्यंत वापरावी हे ठरवून देणे. दिवसाचा तसेच आठवड्याचाही कालावधी ठरवता येईल.
- मुलांनी सोशल नेटवर्किंग साइट्स वापरण्यास तुमची हरकत नसल्यास त्यांनी कोणत्या साइट्स वापराव्या हे आधीच ठरवून देणे.
- मुले वापरीत असलेल्या सोशल नेटवर्किंग साइट्सचे स्वतःच सदस्य होणे ज्यायोगे मुले काय शेअर करतात हे तुम्हाला कळू शकेल.
ऑनलाइन भेटणार्या व्यक्ती सर्वस्वी अपरिचित असतात ह्याची कुटुंबियांना जाणीव द्या
ऑनलाइन "फ्रेंड्स" बरोबर तुम्ही कितीही वेळा आणि कितीही वेळपर्यंत चॅट करीत असाल आणि त्यांना आपण ओळखतो असे तुम्हाला कितीही वाटत असले तरी अशा व्यक्ती खरे तर अपरिचितच असतात.
ऑनलाइन असताना आपण दुसरेच कोणीतरी आहोत असे इतरांना भासवणे आणि खोटे सांगणे फार सोपे असते. लहान मुलांना सांगणे अत्यंत गरजेचे आहे की त्यांच्याशी मैत्री करणारा एखादा नवा ऑनलाइन फ्रेंड प्रत्यक्षात त्यांच्या वयाचा असण्याऐवजी एखादी चाळिशीची व्यक्ती असू शकते. ऑनलाइन भेटणार्या सर्व व्यक्ती खरे तर अपरिचित असतात ह्याची कुटुंबियांना सतत जाणीव द्या
पायरी 4 : ऑनलाइन सुरक्षिततेची गरज समजून घ्या आणि त्यानुसार काही मर्यादा घाला
कॉँप्यूटर आणि इंटरनेटच्या वापराबाबत कुटुंबातील प्रत्येकाची गरज वेगवेगळी असू शकते त्यामुळे त्यांच्या वापरासंबंधीचे कौटुंबिक नियम मान्य करून घ्या. पुढील मुद्द्यांच्या संदर्भात काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे स्पष्टपणे ठरवा
- पाहण्यास योग्य असलेल्या विविध वेबसाइट्स,
- ज्यांच्या वापरावर नजर ठेवता येईल अशाच चॅटरूम आणि फोरम
- स्वतःची खरी ओळख न दर्शवणारी यूझरनेम (वापरकर्त्यांची नावे)
- ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत, अद्वितीय तरीही सहज लक्षात ठेवण्याजोगे पासवर्ड बनवणे
- कुटुंबातील व्यक्तींची नावे, फोन नंबर ह्यांसारखे, ओळख पटण्याजोगे, तपशील शेअर किंवा पोस्ट न करण्याचे वचन देणे
- अयोग्य किंवा ओळख उघड करू शकणारे फोटो (उदा. शहराचे नाव किंवा शाळेच्या गणवेशावरील शाळेचे नाव इ.) कोणीही पोस्ट न करण्याचे वचन देणे
- ऑनलाइन भेटलेल्या व्यक्तीला, कुटुंबियांना न कळवता, प्रत्यक्ष न भेटणे
- अपरिचितांकडून आलेल्या इमेल तसेच ऍटॅचमेंटना प्रतिसाद न देण्याचे वचन
- सायबर बुलिइंग (दमदाटी) किंवा सायबर स्टॉकिंग (पाठलाग करणे), कॉँप्यूटर तसेच ऍप्समध्ये असाधारण प्रक्रिया आढळल्यास कुटुंबियांना कळवण्याचे व त्यांच्याशी चर्चा करण्याचे वचन
खाजगीपणाच्या (गोपनीयतेच्या) नियमांचे पालन
फेसबुक, गूगल प्लस ह्यांसारख्या एखाद्या सोशल नेटवर्किंग साइटवर खाते उघडण्यासाठी तुमची प्राथमिक माहिती त्यांना पुरवावी लागते. अशा साइट्सची स्वतःची गोपनीयता-धोरणे (प्रायव्हसी पॉलिसीज्) असतात. जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांपैकी कोणाला नवीन नेटवर्कचे सदस्य व्हायचे असेल तेव्हा संबंधित नेटवर्कची प्रायव्हसी पॉलिसी नीट वाचा ज्यायोगे नेटवर्कचे प्रशासक आपल्या माहितीचा उपयोग करून घेणार आहेत काय (आणि असल्यास कशाप्रकारे) हे कळेल. तसेच इंटरनेटवरील सुरक्षिततेला असणारे धोके (फिशिंग, ओळख-चोरी इ.) टाळण्यासाठी ते कोणते उपाय योजत आहेत हेदेखील समजेल
पायरी 5 : कुटुंबियांची ऑनलाइन वागणूक व्यवस्थित राहण्यासाठी त्यांच्याकडून करारपत्र आणि ऑनलाइन प्रतिज्ञा मान्य करून घ्या
ऑनलाइन वागणुकीबाबत एक करारपत्रच तयार करा. ह्यामुळे कॉँप्यूटर आणि इंटरनेटच्या योग्य वापरासंदर्भात कुटुंबियांमध्ये एकात्मिक जाणीव उत्पन्न होईल आणि इंटरनेट वापरणार्या सर्वच कुटुंबियांना सुरक्षितता लाभेल.
कॉँप्यूटर आणि इंटरनेटवरील सुरक्षिततेबाबत कुटुंबियांनी पुढीलप्रमाणे एक प्रतिज्ञाही करावी अशी शिफारस करता येईल
प्रतिज्ञा
ज्ञान मिळवण्यासाठी कॉँप्यूटर आणि इंटरनेट फायदेशीर आहेत. काम, करमणूक, चॅट, कनेक्ट इ. साठी मला इंटरनेट वापरायचे आहे. ह्या वापरादरम्यान मला व माझ्या कुटुंबियांना नेटवर सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही ऑनलाइन वागणुकीबद्दल पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा घेत आहोत
ही प्रतिज्ञा पाळण्यास मी वचनबद्ध राहीन ज्यायोगे मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला व पर्यायाने माझ्या देशाला सुरक्षित ठेवू शकेन (सायबर सेफ इंडिया).
- माझ्या कॉँप्यूटर आणि इंटरनेट प्रवेशाच्या सर्व सुरक्षा-नियमांचे मी पालन करीन
- मी माझी ओळख (फोन नंबर, पत्ता, पासवर्ड इ.) कोणाहीकडे उघड करणार नाही
- ऑनलाइन भेटलेल्या लोकांना मी कधीही समक्ष भेटणार नाही, तसा प्रसंग आल्यास माझ्याबरोबर माझे कुटुंबीयही असतील
- कोणत्याही प्रसंगी मला असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटल्यास अथवा एकाद्या साधनाची असाधारण प्रक्रिया जाणवल्यास मी माझ्या कुटुंबियांना (माझ्या पालकांना किंवा शिक्षकांना) तसे सांगेन व त्यांच्याकडून लगेचच मदत घेईन
- ही प्रतिज्ञा पाळण्यास मी वचनबद्ध राहीन ज्यायोगे मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला व पर्यायाने माझ्या देशाला सुरक्षित ठेवू शकेन (सायबर सेफ इंडिया).
- एक पालक किंवा सिक्षक ह्या नात्याने मी तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध राहीन तसेच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी शक्यतितके प्रयत्न आणि सहाय्य करेन